नितेश राणे 
सिंधुदुर्ग

Nitesh Rane| सावंतवाडी आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचे प्रयत्न

ना. नितेश राणे : येत्या २५ वर्षांतील शहराच्या दृष्टीने विकासकामांचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे माझे प्रयत्न आहेत. आमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे त्यामुळे काम केले पाहिजे. सावंतवाडी शहराला पुढच्या २५ वर्षातील शहर म्हणून आपण कसा आकार देऊ शकतो यासाठी नगराध्यक्ष आणि सर्वजण कामाला लागले आहेत तर सावंतवाडीच्या जनतेला दिलेला विकासाचा शब्द पूर्ण होत असून हे शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रविवारी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली, या कार्यक्रमात ना. राणे बोलत होते. आ. दीपक केसरकर, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, लखमराजे भोंसले, न. प. मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी आदी उपस्थित होते.

ना. राणे म्हणाले, आताच विधान परिषदेची निवडणूक झाली. यासाठी आचारसंहिता होती. मात्र आम्ही निवडणूक बिनविरोध करून कोकणातील आचारसंहिता उलथवून टाकली. कोकणात निधी खर्च करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो त्यामुळे जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. मी विकासाला प्राधान्य देणारा असल्याने जास्तीत जास्त विकासकामे कशी पूर्ण होतील व निधी अखर्चित रहाणार नाही, यासाठी माझे प्रयत्न आहेत. सावंतवाडी हे मोती तलावाच्या काठावर वसलेले ऐतिहासिक संस्थान कालीन शहर आहे. निवडणूक काळात सावंतवाडीकरांना आम्ही शहराच्या सर्वांगिण विकासाचा शब्द दिला होता तो शब्द मी, आ.दीपक केसरकर व आ. रवींद्र चव्हाण मिळून पूर्ण करत आहोत. लाड -पागे समितीच्या शिफारसीनुसार कर्मचारी नियुक्ती प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले असल्याचे ते म्हणाले. या शहराच्या विकासासाठी आ. दीपक केसरकर यांचे मोठे योगदान आहे. पुढील २५ वर्षात सावंतवाडी शहर कसे असेल, या दृष्टीने नगराध्यक्षा व नगरसेवक कामाला लागले आहेत. मी जेव्हा या सर्वासोबत बोलत असतो त्यावेळी त्यांच्यात विकासाची तळमळ दिसते. प्रत्येकाला सावंतवाडीचा चेहरा बदलायचा आहे, प्रत्येकाला चौकटी बाहेरचा विकास करायचा आहे. शहराच्या नगराध्यक्षा राजघराण्याच्या आहेत, त्यामुळे आम्हाला केसेसची कुठलीही चिंता नाही. ‘आमचा प्रस्ताव मान्य’ असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

राज्य सरकारने सिंधूरत्न योजनेसाठी २०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण करा आणि मगच पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, असे मंत्री राणे यांनी सांगितले. आ. दीपक केसरकर यांनी या शहरात संत गाडगेबाबा भाजी मार्केट, क्रीडा संकुल प्रकल्प साकारत आहेत. मोती तलाव सुशोभिकारणासाठी निधी आला होता पण तो परत गेला, यावेळी तसे होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT