पंचायत समिती मासिक सभेत अधिकाऱ्यांना जाब विचारताना उपसभापती गणेशप्रसाद गवस व अन्य.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई

दोडामार्ग उपसभापतींकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विकास कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडून दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती मासिक सभेत उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांची झडती घेत कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपूर्ण व उर्वरित प्रस्ताव दोन दिवसात सादर करण्याचा आदेश प्रशासनाला देत दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला.

दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अजेंड्यावरील विषयांबरोबरच दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन, उपाययोजना व आरोग्य विषयीचे मुद्दे प्रामुख्याने हाताळण्यात आले. पं. स. सदस्य स्नेहा गवस यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर बोट ठेवले. नादुरुस्त उपकेंद्राचे प्रस्ताव, त्यात निर्माण होणाऱ्या अडचणी याची जाणीव व माहिती सभेत का देत नाही. जोपर्यंत लोकप्रतिनिधी विचारत नाही तोपर्यंत माहिती देत नसल्याचा रोष अधिकाऱ्यांवर व्यक्त केला.

त्या म्हणाल्या पिकुळे उपकेंद्र नादुरुस्त आहे. त्याची पाहणी आपण स्वतः केली आणि प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. त्याबाबत प्रस्ताव आला का? असे विचारले असता आरोग्य अधिकाऱ्यांकडून आपल्याकडे प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तसेच चतुर्थ श्रेणीच्या नादुरुस्त इमारतींचे निर्लेखन प्रस्ताव देण्यास दिरंगाई होत असल्याचा मुद्दा उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी मुद्दा मांडला. एवढेच नाही तर, अन्य नवीन विकास कामांचे प्रस्ताव वेळेवर मिळत नाहीत. ग्रा.पं. स्तरावरून प्रस्ताव येण्यास हलगर्जीपणा होत आहे. काही मध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त केलेल्या नाहीत. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक लाऊन हे विषय तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना गवस यांनी दिल्या. सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया कुबल, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, गटशिक्षण अधिकारी निसार नदाफ, बांधकामचे उपअभियंता सीमा गोवेकर, तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT