वैभववाडी : भुईबावडा येथील दहावी परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात दोषी ठरलेले माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांच्यावर अद्याप संस्थेमार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नसल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित दोन्ही शैक्षणिक संस्थांवर प्रशासक नेमावेत, अशी शिफारस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण संचालकांकडे केली आहे.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना याबाबत पत्र पाठविले आहे. भुईबावडा केंद्रावर इ.१०वी परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपीप्रकरणात माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय राठोड यांना दोषी ठरविण्यात आले होते.
या प्रकरणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या रत्नागिरी विभागीय सचिवांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत लेखी निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड तसेच न्यू इंग्लिश स्कूल, हेत येथील सहा. शिक्षक संजयकुमार खेमा आडे यांच्याविरुद्ध २३ जून २०२६ रोजी वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राठोड यांना १५ जुलै रोजी अटक करण्यात आली तर सहा. शिक्षक आडे यांना २० जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
संबंधित मुख्याध्यापक व सहा. शिक्षक हे ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस व न्यायालयीन कोठडीत असल्याने महाराष्ट्र खासगी शाळांतील सेवाशर्ती नियमावलीनुसार आवश्यक ती कारवाई होणे अपेक्षित होते. मुख्याध्यापक संजय राठोड यांना निलंबित करण्याबाबत पंचक्रोशी मंडळ, उंबर्डे-वैभववाडीच्या अध्यक्ष व सचिवांना यापूर्वीच आदेश देण्यात आले होते. मात्र, संस्थेने अद्याप त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली नाही. या प्रकरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही वारंवार विचारणा होत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.