देवगड, पुढारी वृत्तसेवा : सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरात धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.३) सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. देवगड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३) मेघराज नार्वेकर हे आपल्या घरातील हॉलमध्ये पत्नीसमवेत बसलेले असताना संशयित अनिल नार्वेकर हे तेथे आले. त्यांच्या हातात एक कापडी पिशवी होती. नार्वेकर याने मेघराज यांना 'तू माझ्याकडून तुझ्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ५ हजार रूपये आत्ताच्या आत्ता दे', असे सांगितले. यावर मेघराज यांनी 'माझे वडील मृत होऊन १० वर्षे झाली आहेत. ते पैसे मागायला आत्ता का आलास? तुझे मी ५ हजार रूपये घेतलेले नसून २ हजार रूपये घेतलेले होते. माझा पगार झाल्यावर तुला ते २ हजार रूपये परत करतो', असे सांगितले.
त्यानंतर नार्वेकर हा मेघराज याला 'थांब, तुला बघून घेतो' असे बोलून हातात पिशवी घेवून बाहेर गेला व अचानक थांबून पुन्हा हॉलमध्ये आला. नार्वेकर याने आपल्या हातातील कापडी पिशवीतून आणलेला मोठा सुरा बाहेर काढून मेघराजच्या डोकीच्या डाव्या बाजूने वार केला. 'तुला जिवंत सोडत नाही' असे म्हणून त्याने मेघराजच्या छातीवर उजव्या बाजूस, उजव्या हाताची करंगळी व डाव्या हाताच्या पंजावर सुरीने वार करून मेघराजला रक्तबंबाळ केले.
यावेळी मेघराजच्या पत्नीने आरडाओरड करून नार्वेकर याच्या हल्ल्यातून मेघराजला सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापतीत मेघराजच्या पत्नीलाही किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर नार्वेकर हा घराच्या मागच्या दरवाज्यातून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत मेघराज यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद मेघराज यांची पत्नी सोनाली नार्वेकर यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.