मडुरा : मडुरा मोरकेवाडी येथील सार्वजनिक विहिरीत रविवारी सकाळी मृत बिबट्या तरंगताना दिसून आला. वन विभागाच्या कर्मचार्यांनी मृत बिबट्या बाहेर काढून शिवविच्छेदन केले. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळला असावा, असा अंदाज वन अधिकार्यांनी व्यक्त केला. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन करून मृत बिबट्या वन अधिकार्यांच्या ताब्यात दिला.
मडुरा मोरकेवाडी येथील गवंडी कुटुंबीयांच्या सार्वजनिक विहिरीत रविवारी पहाटे नामदेव गवंडी यांना बिबट्या मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी वन विभागाला दिल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, नेहा वानरे, वनपाल प्रमोद राणे यांच्यासह वन कर्मचारी व जलद कृती दलाचे कर्मचारीही दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन करून बिबट्या वन विभागाच्या ताब्यात दिला.