कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवीळकाटे-बावकवाडी येथील ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात व्यक्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. महिलेने विरोध करत आरडाओरड केल्याने संशयिताने तेथून पळ काढला. या घटनेमुळे कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत विमल विलास मातोंडकर (वय ३४, व्यवसाय मोलमजुरी, रा. कवीळकाटे-बावकवाडी, ता. कुडाळ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात घटनेची माहिती दिली आहे. त्या दररोज सकाळी घरातून निघून कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी जातात. शनिवारी सकाळी सुमारे ६ वा.त्या घरातून कामासाठी निघाल्या. स. ९ वाजता काम संपल्यानंतर त्या हॉटेलमधून पायी घरी परतत होत्या. सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास त्या कुडाळ रेल्वे स्थानकाजवळून रेल्वे ट्रॅक ओलांडून जात असताना मागून रेल्वे येत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला चालत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांना रेल्वे ट्रॅकवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मातोंडकर यांनी त्यास जोरदार विरोध केला. त्यांनी आरडाओरड केल्याने संशयिताने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोडले. त्यानंतर त्याने तेथून कुडाळ रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला.
या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक व काम करणारे काही लोक धावत आले. मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता. महिलेच्या जबाबानुसार त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र सुमारे ६ ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत अंदाजे ३२ हजार रुपये आहे. मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांसह सोन्याची वाटी, दोन सुट्या मण्यांसह सोन्याच्या तारेत बनविलेले मंगळसूत्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. घटनेनंतर मातोंडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्याची मागणी
कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातून नागरिकांची व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा ठिकाणी महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करत आहेत.