दहिबांव-बांवकरवाडी येथे नातवाचा आजी-आजोबांवर प्राणघातक हल्ला 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : दहिबांव-बांवकरवाडी येथे नातवाचा आजी-आजोबांवर प्राणघातक हल्ला

संशयिताला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

देवगड : एका क्षुल्लक कारणावरून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मधुकर रामजी बांवकर (वय ८४) व त्यांची पत्नी आनंदी मधुकर बांवकर (७०, दोघे रा. दहिबांव- बांवकरवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना १७ ऑगस्ट रोजी सायं. ६.३० च्या सुमारास घडली. यातील मुख्य संशयित अक्षय चंद्रकांत बांवकर (वय ३२, रा. दहिबांव-बांवकरवाडी) याला देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी त्याला देवगड न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी मधुकर बांवकर हे घरातील गायीचे दूध काढत असताना त्यांचा चुलत नातू अक्षय बांवकर तेथे आला. गुरांच्या मालकीवरून व गायीचे दूध काढण्याचा रागातून त्याने मधुकर बांवकर यांच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून व लाकडाने मारहाण केली. हे पाहून पत्नी आनंदी या पतीला वाचविण्यासाठी पुढे सरसावल्या. यावेळी संशयिताने त्या दोघांनाही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच आनंदी यांच्या डोक्यावर व डाव्या हातांच्या बोटावर संशयिताने कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली.

यावेळी आनंदी यांचा पुतण्या चंद्रकांत विठ्ठल बांवकर हा त्यांना सोडविण्यासाठी आला असता संशयित त्यांचा अंगावरही मारण्यासाठी धावून गेला. या घटनेची फिर्याद आनंदी बांवकर यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिली असून संशयित अक्षय बांवकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन देवगड पोलिसांना सखोल तपास करण्याबाबत सूचना केल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT