वेंगुर्ले : तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथे १९ लाख ७२ हजार रुपयांची धाडसी चोरी बुधवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
या चोरी बाबत सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२, मूळ रा. दाभोली मोबारवाडी ता. वेंगुर्ला सध्या रा. अंधेरी (प.) मुंबई) यांनी वेंगुर्ला पोलिस स्थानकात बुधवारी चोरीची तक्रार दिली. ही चोरीची घटना दि. १८ जून दुपारी १२.३० वा. ते २१ सप्टेंबर सकाळी ६ वा. या मुदतीत घडली आहे.
या चोरीमध्ये चोरट्यांनी डायमंडचे डिझाईन असलेले ५७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत बुधवारी दाखल तक्रारी नुसार चोरट्याविरोधात वेंगुर्ला पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.