कणकवली : कणकवलीतील दोन युवतींचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी शहरातील एका सलूनमधील परप्रांतीय कामगार बंटी सूखविंदर गिल (२२) व हरप्रित मलखित सिंह (२५, दोन्ही रा. पंजाब) यांच्याविरूध्द त्या युवतींच्या तक्रारीवरून पाठलाग करून विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोघांना कणकवली न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
शुक्रवारी दुपारी वरील संशयित आरोपींनी त्या युवतींची छेडछाड केल्याच्या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. याप्रकरणी रात्री उशिरा त्या युवतींच्या तक्रारीवरून वरील दोन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बहिणी असलेल्या दोन युवती शुक्रवारी दुपारी 2.30 वा. सुमारास शिवण क्लाससाठी बाजारात जात असताना वरील दोन संशयित आरोपींनी त्यांचा पाठलाग करून हाताला धरून ओढले व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यातील एक युवती अल्पवयीन असून याप्रकरणी त्या दोन्ही आरोपींविरूध्द विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.