नांदगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असणा-या कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ- सुतारवाडी येथे दारूच्या नशेमध्ये चक्क पोटच्या गोळ्यानेच आपल्या आईचा खून केल्याची घडली आहे. सदर घटना बुधवारी रात्री ११.३० वा. सुमारास राहत्या घरी घडली.
या घटनेत आई प्रभावती रामचंद्र सोरफ (८०) या जागीच मृत्युमुखी पडल्या. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ (४५) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात आता, गुरुवारी सकाळच्या सुमारास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र याला दारूचे व्यसन आहे. सोरफ कुटुंबीय वारगांव सोरफ - सुतारवाडी येथील एका घरात राहत असून या घरामध्ये पाच बिऱ्हाडे आहेत.
बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रभावती व मुलगा रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाले. त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि ठिकठिकाणी वार केले. रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला तसेच ओढत ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. अवघ्या काही क्षणामध्ये घडलेल्या प्रकारामुळे सोरफ कुटुंबीय हादरून गेले.
माहिती मिळताच कणकवली पोलीस पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, उपनिरीक्षक महेश शेंडगे, श्री सावंत, मेजर देसाई, पराग मोहिते, गुनिजन, पोलीस पाटील दिलीप नावळे हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी कोयत्याचे गंभीर वार होते. अखेर पोलिसांनी संशयित रवींद्र याला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले. अद्याप त्याची कसून चौकशी सुरू आहे. घडल्या प्रकारामुळे वारगाव परिसरात खळबळ उडाली आहे.