विवाहितेचा छळ File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| विवाहितेचा छळ : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

देवगड : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत तसेच मूलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडित विवाहितेच्या पतीसह सासू-सासरे व नणंद अशा चार संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ मे रोजी तळेबाजार- मानेनगर येथे घडली असून घटनेतील सर्व संशयित हे मूळ कर्नाटक राज्यातील कलबुर्गी- अफजलपूर (ता. भोसगागाव) येथील आहेत. पीडित विवाहितेने कर्नाटक राज्यातील कलाकेरी पोलीस स्थानकात १२ मे रोजी फिर्याद दाखल केली असून या प्रकरणाचा तपास देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदर पीडित महिलेचे सिद्धाप्पा चंद्रकांत चित्रगार (३०) याच्यासमवेत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सिद्धाप्पा याने लग्नावेळी पीडित विवाहितेच्या कुटुंबाकडून दहा ग्रॅम सोने व दोन लाख रुपये घेतले होते. लग्नानंतर सदर पीडित विवाहिता पती सिद्धाप्पा, सासू अन्नपूर्णा चंद्रकांत चित्रगार (४५), सासरे चंद्रकांत चित्रगार (५०) व नणंद जयम्मा (३२) यांच्यासमवेत कामानिमित्त देवगड तालुक्यातील तळेबाजार मानेनगर येथे राहण्यास आली होती. लग्नानंतर सहा महिन्यापासून सिद्धाप्पा हा दारु पिऊन घरी येत पीडित विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत असे. तिला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. तसेच सासू-सासरे व नणंद हेदेखील पीडित विवाहितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते. हा प्रकार पीडित विवाहितेने आपल्या काकांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ गावातील न्याय पंचायतीमार्फत सिद्धाप्पा याची समजूत काढत त्यांना २० ते ३० हजार रूपये दिलेले होते. मात्र, त्यानंतरही पीडित महिलेचा छळ संशयितांनी सुरू ठेवला.

पीडित विवाहितेला दोन मुली असल्याने मूलगा होत नाही, या कारणास्तव तिच्या पतीसह सासू-सासरे व नणंद यांनी तिला शिवीगाळ केली. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी पीडित विवाहिता ही देवगड- तळेबाजार येथे कामानिमित्त आलेली होती. दरम्यान, ९ मे रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास चारही संशयितांनी सदर पीडित विवाहितेला लोखंडी रॉड, चुलीतील लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. याबाबतची फिर्याद पीडित विवाहितेने विजापूर- कलाकेरी पोलीस स्थानकात १२ मे रोजी दाखल केली. हे प्रकरण १२ जून रोजी देवगड पोलीस स्थानकात तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार सदर पीडितेचे पती सिद्धाप्पा चित्रगार, सासरे चंद्रकांत चित्रगार, सासू अन्नपूर्णा चित्रगार, नणंद जयम्मा या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT