अज्ञाताच्या गोळीबारात एक ठार 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : अज्ञाताच्या गोळीबारात एक ठार

एक गंभीर; शिकारीसाठी गेले असता आचिर्णे-कालवा परिसरातील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : आचिर्णे-घाणेगडवाडी येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. सागर सुरेश पोटळे (वय 31) असे मृत तरुणाचे नाव असून कृष्णा सुरेश कातकर (25, दोन्ही रा. आर्चिणे-घाणेगडवाडी) हा जखमी झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला आहे.

...असा घडला गोळीबाराचा थरार

याबाबत जखमी कृष्णा कातकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यांच्या वडिलांकडे परवाना असलेली सिंगल बॅरल काडतुशी बंदूक आहे. त्याचा मित्र नेताजी वरकर (रा. राधानगरी) याने आचिर्णे येथे त्यांच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर उसाची शेती केलेली आहे. या शेतीची राखण करण्यास त्यांनी त्याला सांगितले होते. म्हणून तो आपला मित्र सागर पोटळे याला घेऊन उसाच्या मळ्यात गेला होता. सदर पायवाटेलगत असलेल्या कालव्याचे कच्च्या रस्त्याने दोन इसम दुचाकीवरून आले. मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील बंदुकीने सागर पोटळे व कृष्णा कातकर यांच्या दिशेने गोळीबार केला. यात कृष्णाच्या उजव्या हाताच्या दंडाला गोळी लागली तर सागर याच्या छातीवर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

उपचारापूर्वीच सागरचा मृत्यू

या प्रकारानंतर कृष्णाने मित्रांना बोलावून घेतले. सागरला त्याच्या घरी नेण्यात आले. रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सागरला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कृष्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरिष्ठांची धाव, तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकानेही पाहणी केली आहे. घटना घडून दोन तासानंतर पोलिसांना माहिती का देण्यात आली? तसेच हे अज्ञात हल्लेखोर कोण होते? याचा पोलिस सर्व बाजूंनी कसून तपास करत असून, काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT