दोडामार्ग : साटेली-भेडशी वरचीवाडी परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या घरफोडी प्रकरणाचा दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत एका संशयिताला अटक केली आहे. हर्ष सूर्यकांत नाईक (१९, रा. साटेली -वरचीवाडी) असे अटक संशयिताचे नाव असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या घरफोडीमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे चोरीस गेलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हे घरमालक रोमाल फर्नांडिस यांच्या विवाहासाठी आणून ठेवण्यात आले होते. त्याशिवाय सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि इतर वस्तूंवरही चोरट्याने हात साफ केला होता. या घरफोडीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने संशयिताच्या घरापर्यंत माग काढल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. त्याचबरोबर तक्रारदारांनीही हर्ष नाईक याच्यावर संशय व्यक्त केला होता. या दोन्ही बाबींच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
पोलिसांच्या चौकशीत संशयिताने आपण साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. मात्र, या प्रकरणातील चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित चौकशीदरम्यान वारंवार वेगवेगळी माहिती देत असल्याने तपासात अडथळे निर्माण होत आहेत. चोरीचे दागिने आणि रोख रक्कम नेमकी कुठे लपवली? ते विक्री केली का? तसेच या गुन्ह्यामागे त्याचे इतर साथीदार कोण? याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून संशयिताच्या हालचाली, मोबाईल कॉल रेकॉर्ड, त्याच्या घरालगतचे सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.