वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहावीच्या परीक्षेतील कॉपीप्रकरणी २४ जणांना कोकण विभागीय मंडळाने दोषी ठरविले असून त्यापैकी मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, उंबर्डे) व संजयकुमार खेमा आडे (सहायक शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, हेत) यांच्यासह अन्य एका अज्ञातावर वैभववाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी ही जबाबदारी वैभववाडी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांच्यावर सोपवली होती. दरम्यान, इतर २१ जणांवरच्या कारवाया त्या त्या संस्थाचालक यांनी कराव्यात अशा सूचना देण्यात आले आहेत. आपल्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळावेत, या लालसेपोटी संबंधित विद्यार्थ्यांचा पालक असलेल्या मुख्याध्यापक संजय राठोड यांनी हा कॉपी प्रकार घडवून आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संजय राठोड, पर्यवेक्षक संजय कुमार आडे आणि प्रत्यक्ष कॉपी लिहिणारी अज्ञात व्यक्ती अशा तिघांविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा कालावधीत पेपरदिवशी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक राठोड आणि रिलीव्हर पर्यवेक्षक आडे हे परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीच्या हस्ताक्षरातील उत्तरे लिहिलेल्या पुरवण्या वर्गावरील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या मुख्य उत्तरपत्रिकेस जोडण्यास सांगत असत असा आरोप कोकण विभागीय मंडळाच्या चौकशीत ठेवण्यात आला आहे.