Liquor smuggling | Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : गोवा दारूची चक्क डंपरमधून वाहतूक

१४ लाखांच्या दारूसह डंपर जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा : कुडाळ पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळच्या दिशेने डंपरमधून होणारी गोवा दारूची तस्करी कुडाळ पोलिसांनी उधळून लावली. पिंगुळी-टेंबधुरीनगर येथे हा गोवा दारू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांनी रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत १४.२० लाखांच्या बेकायदा दारूसह सुमारे २४ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डंपर चालक शुभम सचिन सावंत (रा. वर्दे-गावठणवाडी, ता. कुडाळ) व नदीम शेख (रा. कुडाळ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री मुसळधार पाऊस सुरू असतानाच, डंपरच्या हौद्यावर प्लास्टिक ताडपत्री घालून या दारूची बिगर परवाना वाहतूक केली जात होती. पोलिसांनी हा डंपर पकडून पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर डंपरमधील दारूने भरलेले बाॅक्स खाली उतरविण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी रात्री महामार्गावरून डंपरमधून गोवा दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहा.पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने महामार्गावर बिबवणे येथे सापळा रचला. दरम्यान पोलिसांनी तेथे आलेला डंपर थांबविण्याचा इशारा करूनही चालकाने तो न थांबवता भरधाव वेगाने पुढे पळवला. पोलिसांनी लागलीच त्याचा पाठलाग करून डंपर पिंगुळी -टेंबधुरीनगर येथे अडवला. तपासणी केली असता असता डंपरच्या हाैद्यात विविध ब्रँडच्या गोवा दारूचे बाॅक्स आढळून आले.

यात १० बॉक्समध्ये १,२०,००० रू.किंमतीच्या १८० मि.ली. मापाच्या मॅकडॉल दारूच्या ४८० बाटल्या प्रत्येक बाटल्या. ६ बॉक्समध्ये २८ हजार ८०० रू.किंमतीच्या १८० मि.ली. मापाच्या रॉयल ब्रँड दारूच्या २८८ बाटल्या. ५ बॉक्समध्ये ७२ हजार रू.किंमतीच्या १८० मि.लि.च्या रॉयल चॅलेंज दारूच्या २४० बाटल्या, असा एकूण १४ लाख २० हजार ८०० रूपये किंमतीचा बेकायदा दारूसाठा आढळून आला. या दारूसह १० लाखांचा डंपर व ३०० रूपये किंमतीचा लोखंडी धारदार कोयता असा एकूण सुमारे २४ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल शांताराम वराडकर यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई कुडाळचे प्रभारी पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. अधिक तपास उपनिरीक्षक पाडावे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT