Crime News pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime | गुरांच्या मालकीच्या वादातून वृद्ध दाम्पत्यावर नातवाचा कोयत्याने हल्ला; पती-पत्नी गंभीर जखमी!

देवगड तालुक्यातील दहिबांव बांवकरवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

देवगड : किरकोळ कारणावरून नातवाने आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देवगड तालुक्यातील दहिबांव बांवकरवाडी येथे घडली. या हल्ल्यात मधुकर रामजी बांवकर (८४) आणि त्यांची पत्नी आनंदी मधुकर बांवकर (७०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मुख्य संशयित अक्षय चंद्रकांत बांवकर (३२, रा. दहिबांव बांवकरवाडी) याच्याविरुद्ध देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मधुकर बांवकर हे आपल्या राहत्या घरातील देवघराच्या बाजूला गायीचे दूध काढत होते. त्यावेळी गुरांच्या मालकीवरून तसेच गायीचे दूध काढण्याच्या कारणावरून संतापलेल्या संशयित अक्षय बांवकर याने मधुकर यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाकडाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

हा प्रकार पाहताच त्यांची पत्नी आनंदी बांवकर यांनी पतीला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी संशयिताने दोघांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आनंदी यांच्या डोक्यावर आणि डाव्या हाताच्या बोटांवर कोयत्याने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले.

दरम्यान, आनंदी बांवकर यांचा मुलगा चंद्रकांत विठ्ठल बांवकर हा त्यांना सोडविण्यासाठी आला असता संशयिताने त्याच्यावरही अंगावर धावून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आनंदी बांवकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अक्षय बांवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), १३१, ३५१(२)(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी मधुकर व आनंदी बांवकर यांना प्रथम उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जामसंडे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गुन्हा दाखल होताच देवगड पोलिसांनी संशयित अक्षय बांवकर याला तात्काळ अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन देवगड पोलिसांना या घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास देवगड पोलीस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT