सावंतवाडी : दाणोली-सातोळी तिठा येथे शनिवारी सायंकाळी बेकायदेशीर आणि विनापरवाना गोवंश प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ७ जनावरांची सुटका करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित नागराज रामन्ना जैन (४२), रामचंद्र नारायण सिद्धी (४३, दोघे रा. यल्लापूर, जि. उत्तर कन्नड), अजित नारायण धवन (३७, रा. न्हावेली, ता. सावंतवाडी) आणि प्रकाश बाळा कोरगावकर (७१, रा. मळगाव कुंभार्ली) हे 'छोटा दोस्त'आणि 'टाटा एस या दोन टेम्पोमधून प्राण्यांची अवैध वाहतूक करत होते. कोणत्याही परवान्याशिवाय राजापूर ते कर्नाटक अशा पद्धतीने तीन गायी, एक वासरू आणि तीन बैल अशी एकूण ७ जनावरे वाहनातून घेऊन जात असताना सातोळी तिठा येथे पोलिसांनी त्यांना पकडले.
पोलिसांनी सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत रवाना केले. तसेच, दोन्ही वाहने जप्त केली. याप्रकरणी ट्रॅफिक पोलिस जमादार आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष गलोले करत आहेत.