मडुरा : शेतकर्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सहा. गटविकास अधिकारी मंगेश जाधव यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पाडलोस कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत पाडलोस यांच्या विद्यमाने कृषी दिन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. जाधव बोलत होते.
पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शैलेश परब, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर, मृदा शास्त्रज्ञ डॉ.मोरे, कृषी तंत्र विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास गवस, सावंतवाडी पं. स. कृषी अधिकारी शुभदा कविटकर, पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच राजू शेटकर आदी उपस्थित होते. गावातील तिन्ही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी कृषी दिंडी काढली. शेतकर्यांना फळबाग लागवडीचे सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईम्बर व सहकर्यांनी दाखविले.
वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. मोरे यांनी भात पीक एकात्मिक खत व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. भात पिका करिता सिलिकॉन या अन्नघटकाच्या आवश्यकतेबाबत त्यांनी माहिती दिली. वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर यांनी भात पिकावरील कीड रोगांबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्या नेमळे येथील शेतकरी लक्ष्मण परब, तालुकास्तरावर भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे मळेवाड येथील शेतकरी नारायण मधुसूदन मुळीक, द्वितीय क्रमांक निरवडे येथील भरत नारायण माणगावकर, तृतीय क्रमांक पटकावणारे धाकोरे येथील बाळकृष्ण लक्ष्मण हळदणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळवणारे पत्रकार तथा पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक तसेच पत्रकार प्रवीण परब यांचा सत्कार करण्यात आला. सहा. कृषी अधिकारी श्री ननवरे तसेच बायोगॅस व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक यांचाही सत्कार करण्यात आला.