सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानक परिसरातून प्रवासी महिलेचे १२ तोळे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेणाऱ्या एका संशयित दाम्पत्याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली गडनदी जवळ शिताफीने पकडले. दीपक संतोष सकट (२७) आणि अमृता दीपक सकट (२१, दोघे रा. मसुरकर किनई, कणकवली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी या चोरीची कबुली दिली असून, या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
२१ सप्टेंबर रोजी प्रियंका लाड (रा. कुडाळ) या सावंतवाडी बस स्थानकातून एसटीने प्रवास करत असताना या संशयित दाम्पत्याने त्यांचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या दाम्पत्याचे स्केच जारी केले होते.
सावंतवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या गुन्ह्यात समांतर तपास करत होते. अखेरीस या दोन्ही संशयितांना शुक्रवारी कणकवली-गडनदी जवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून एलसीबीच्या पथकाने शिताफीने पकडले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा छडा लावला. संशयितांनी या दागिने चोरीची कबुली दिली आहे व चोरीचा मुद्देमाल कर्नाटक येथे ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला हवालदार रूपाली खानोलकर, हवालदार जॅकसन घोन्सलवीस आणि अंमलदार अमर कांडर यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.