कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियोजनबद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' केला. खुद्द जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या मोहिमेचे थेट नेतृत्व केले. रात्रीच्या काळोखात महसूल विभागाच्या विविध पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी धाडी टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी १५ वाहने ताब्यात घेतली. प्रशासनाच्या या 'धडक' कारवाईमुळे वाळूमाफिकांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध वाळू वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या मोहिमेचे आखणी अत्यंत गुप्तपणे केली होती. कोणालाही सुगावा लागू नये याची काळजी घेत, रात्रीच्या शांततेत महसूल यंत्रणा अचानक सक्रिय झाली. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तहसीलदारांना विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. रात्री उशिरा सुरू झालेली ही कारवाई पहाटे ३ वा.पर्यंत सुरू होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तहसीलदारांच्या पथकांनी जिल्ह्याच्या सीमा आणि मुख्य मार्गांवर सापळा रचला. यामध्ये कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तोंडवली येथे सापळा लावून ३ वाहने पकडली. कणकवली तहसीलदार दीक्षात देशपांडे यांनी कुंभारमाठ परिसरात ३ वाहनांवर कारवाई केली. वेंगुर्लेत तहसीलदार ओंकार ओतारी यांनी देवलीमार्गे परुळेकडे जाणारी ३ वाहने रोखून धरली. वैभववाडीमध्ये तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी आचरा-कणकवली मार्गावर २ वाहने जप्त केली. मालवण तालुक्यात तहसीलदार गणेश लवे यांनीही आपल्या पथकासह विविध ठिकाणी गस्त घालत वाळू चोरांच्या नाड्या आवळल्या.