जिल्हाधिकाऱ्यांकडून पोईप परिसरातील भातशेती नुकसानीची पाहणी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जिल्हाधिकाऱ्यांकडून पोईप परिसरातील भातशेती नुकसानीची पाहणी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

विरण : जिल्ह्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच पावसाची अनियमितता राहिल्यामुळे काही भागांमध्ये शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसातील मोठा खंड आणि त्यानंतर जाणवलेली तीव्र उष्णता यामुळे भात पिकासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, विहिरींच्या पाणी पातळीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील पोईप गावाला भेट देत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेती परिस्थितीची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतांमध्ये जाऊन भात पिकाची सद्यस्थिती, पिकांची वाढ, पिकांना उपलब्ध असलेले पाणी तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीचीही पाहणी करून शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जलस्रोतांची स्थिती जाणून घेतली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंडामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. भातशेतीच्या ऐन वाढीच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाले असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा या काळात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत घट होत असून, त्याचा परिणाम शेतीच्या सिंचनाबरोबरच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरही होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळण्यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे मागणी करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही केली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक-नवरे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, मंडल अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT