कणकवली ः सावडाव - ओटव रस्त्यावर रविवारी सायंकाळी पावणेआठ वा.च्या सुमारास दोन गटांत हाणामारीची घटना घडली. यामध्ये चौघेजण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या वादातून ही घटना घडली.
याप्रकरणी नयना वैभव सावंत (रा.सावडाव-गावकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास त्या आणि त्यांचे पती वाडीतील प्रमोद नरसाळे यांच्या जमिनीत जेसीबी लावून मोटारसायकलने घरी जात असताना संशयित दत्ताराम मनोहर काटे (वय 45) याने प्रमोद नरसाळे यांना तू रस्ता का अडवतो, असे विचारून शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारले. त्यानंतर नयना सावंत या तेथे गेले असता त्यांनाही हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यावेळी नयना सावंत या जमिनीवर खाली पडल्या असता दत्ताराम काटे याने अन्य संशयित संदीप मनोहर काटे (42), गणेश काटे (42), संतोष साळुंखे (38), व्यंकटेश वारंग (40) यांना तेथे बोलावून घेतले, त्या सर्वांनी मिळून नयना सावंत, पती वैभव सावंत व प्रमोद नरसाळे यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली. वैभव सावंत यांना संशयितांनी ढकलून दिले. संशयित संदीप काटे याने दगड उचलून नयना सावंत यांचे पती वैभव सावंत यांच्या डोक्यावर व छातीवर मारून दुखापत केली तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. सुरेश मोरे यांनाही मारहाण करून धमकी देण्यात आली, असे फिर्यादी नयना सावंत यांनी म्हटले आहे. याप्रकरणी नयना सावंत यांच्या तक्रारीवरून दत्ताराम काटे, संदीप काटे, गणेश काटे, संतोष साळुंखे, व्यंकटेश वारंग (सर्व रा. सावडाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर दत्ताराम मनोहर काटे (45, रा.सावडाव-काटेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी 7.40 वा. च्या सुमारास सावडाव फाटा-ओटव या रस्त्याने आपल्या ताब्यातील मोटरसायकलने जात असताना संशयित नयना वैभव सावंत (40),वैभव दत्ताराम सावंत(42), प्रमोद नरसाळे(35), सुरेश शामराव मोरे(52, सर्व रा, सावडाव) यांनी त्यांना अडवले तेव्हा दत्ताराम काटे यांनी तुम्ही का अडवले असे विचारले असता नयना सावंत यांनी शिवीगाळ करुन दत्ताराम काटे यांच्या अंगावरील टि शर्ट फाडला तसेच सर्व संशयितांनी त्यांना रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दत्ताराम काटे यांच्या डाव्या बाजूच्या छातीवर चाकूने मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी दत्ताराम काटे यांच्या तक्रारीवरुन नयना सावंत, वैभव सावंत, प्रमोद नरसाळे, सुरेश मोरेयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर सावंत करत आहेत.