सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गवासीयांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. शेती आणि मासेमारीबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे, आर्थिक समृद्धी यावी, हा त्यामागील उद्देश होता. या पर्यटन धोरणाला बळ देण्यासाठी जिल्ह्याला स्वतःचे विमानतळ असावे, यासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतला. एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी-वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली. विमानतळ तयार झाल्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणांहून विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कालांतराने ही सेवा बंद पडली. त्यानंतरच्या काळात तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांनीही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या विकासाला गती देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विमानतळासमोरील रस्ते, वीजपुरवठा, नाईट लँडिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) मिळविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी व्हीजीएफ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या विमान कंपन्यांनाही या विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील
१६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१ कंपनीची सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.