कणकवली ः चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरू झाली नाही तर या विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी दिला होता. त्यावर कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना भाजप नेते खा. नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेत वैभव नाईक यांना उद्देशून विमानतळाला टाळे मारूनच दाखव, तुझ्या घराला टाळे ठोकले नाही, तर नारायण राणे नाव सांगणार नाही असा इशारा दिला.
राणे आणि ठाकरे शिवसेनेत जुंपल्याने राजकीय वादाची ठिणगी यानिमित्ताने पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, राणेंच्या या इशार्यावर वैभव नाईक यांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या धमक्यांना घाबरत नाही, विमानसेवा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकून दाखवू, असे म्हटले आहे.
दरम्यान, हा वाद ज्या कारणासाठी लागला त्या विमानसेवेत नियमितता येणार तरी कधी? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. चिपी विमानतळावरून अलिकडच्या काळात नियमित विमानसेवा होत नाही. त्यामुळे जिल्हावासियांसह मुंबईसह इतर ठिकाणाहून ये- जा करणार्या पर्यटकांसाठीही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे विमानसेवेच्या नियमितीकरणासाठी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनाचा इशारा दिला. चिपी विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा माजी आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर खा. नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यटन महोत्सवाच्या समारोपात बोलताना नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. राणे म्हणाले, आपण ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी विरोधकांनी या विमानतळाला विरोध केला. तांत्रिक मुद्याने बंद असलेले चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. पण काही विरोधक मीडियातून धमकी देतात की चिपी विमानतळाला कुलूप ठोकणार. पोलिसांना सांगतो जर कोणी अशी धमकी देत असेल तर गुन्हे नोंदवा. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे.
यावर माजी आमदार वैभव नाईक, यांनी राणेंनी धमक्या देण्यापेक्षा विमानसेवा सुरळीत कशी होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राणेंनी कितीही विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने विमानसेवा सुरू होण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवत राहू. जिथे टाळे ठोकावे लागेल तिथे ठोकणारच असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान चिपी विमानतळावरून मात्र राणे आणि ठाकरे शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा भडकल्याचे दिसत आहे.
वैभव नाईकांवर टीकास्त्र डागताना राणे म्हणाले, 10 वर्षे आमदार असलेले वैभव नाईक विधानसभेत 5 मिनिटेही कधी शुद्ध मराठी भाषेत बोलताना दिसले का? म्हणे विमानतळाला टाळे मारतो, कधी मारतोस ते सांग जरा, टाळे मारूनच दाखव, नाही तुझ्या घराला टाळे मारले नाही तर नारायण राणे नाव सांगणार नाही. कुणाला धमक्या देत आहात? असा सवाल राणे यांनी वैभव नाईकांना केला.
राणेंच्या या आक्रमक भूमिकेवर माध्यमांनी माजी आ. वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता वैभव नाईक म्हणाले, दोन-चार महिन्यांपूर्वी आपण बघितलं असेल, नारायण राणे यांनी विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून पत्र दिले होते. परंतु, अजूनही विमानसेवा सुरळीत झालेली नाही, हे पाहता राणे हे आपले अपयश लपवत आहेत. खरे तर राणेंची याआधीचीही संस्कृती आहे की, घरात घुसून मारू, घराला टाळे ठोकू; परंतु अशा धमक्यांना आपण कधी भीक घातली नाही, यापुढेही घालणार नाही.