सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मालपे येथील ऋत्विक निलेश जुवळे (वय ८ रा. मालपे पोंभूर्ले) या चिमुकल्याला चार मोकाट कुत्र्यांनी आडवत हाताला व अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेत गंभीर जखमी केल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋत्विक सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून घराशेजारी असलेल्या मळ्यामध्ये जात असताना समजीसकरवाडी येथे आल्यावर रस्त्यावरील चार मोकाट कुत्र्यांनी त्याला अडवीत त्याला विविध ठिकाणी चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ऋत्विक याने जोरजोरात आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली असता बाजूलाच असलेल्या घरातील मंडळींनी त्या ठिकाणी धाव घेत ऋत्विक ची त्या मोकाट कुत्र्यांपासून सुटका केली. मात्र त्या मोकाट कुत्र्यांनी ऋत्विकला ठिकठिकाणी चावा घेतल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला फणसगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र कुत्र्यांनी चावा बऱ्याच ठिकाणी घेतल्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ऋत्विक याला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज ओरोस येथे हलवण्यात आले आहे.