चाकरमानी तरुणाचा गड नदीपात्रात बुडून मृत्यू 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : चाकरमानी तरुणाचा गड नदीपात्रात बुडून मृत्यू

मालवण-हिवाळे गावातील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

विरण : मालवण तालुक्यातील हिवाळे-घुरीवाडी येथील मूळ रहिवासी तथा सध्या मुंबई-नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या व गौरी-गणपती सणासाठी आपल्या हिवा येथे गावी आलेल्या यश अनंत धुरी (१८) या तरुणाचा हिवाळे घुरीवाडी देवकोंड ब्रिजच्या वरच्या बाजूला नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वा. च्या दरम्यान घडली.

यश धुरी हा गाैरी-गणपती उत्सवासाठी आपल्या वडिलांसमवेत गुरुवार १७ रोजी मुंबईवरून गावी आला होता. गुरुवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत तो वाडीतील भजनात सहभागी झाला होता. त्यानंतर तो घरी येऊन पहाटे झोपी गेला. शुक्रवारी स. १० वा. च्या दरम्यान तो वाडीतील मित्रांसोबत गड नदीपात्रातील ब्रिजच्याच्या बाजूला असलेल्या देवकोंड परिसरात पोहण्यासाठी नदीत उतरला.

नदीत पोहत असताना पाण्याच्या चक्रीय प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दरम्यान, सोबत असलेल्या मित्राला तो दिसून न आल्याने त्याने याबाबत वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. या घटनेची खबर हिवाळे पोलिसपाटील वीरेंद्र कदम यांनी बेळणे पोलिस दूरक्षेत्राला दिल्यावर आचरा पोलिस स्थानकाचे एपीआय संजय कातिवले, एएसआय उत्तम वंजारे, हे कॉ. सचिन करवंजे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली.

दरम्यान यश याच्या शोधासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला व रेस्क्यु टीमला पाचारण केले असता दोन्ही विभागांकडून सहकार्य न मिळाल्याने हिवाळे-घुरीवाडी ग्रामस्थांनी थेट पाण्यात उतरत यशचा शोध सुरू केला. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशचा मृतदेह नदीतील गाळात रूतलेल्या अवस्थेत आढळून आला. वाडीतील तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह विच्छेदनासाठी हिवाळे प्रा. आ. केंद्रात पाठविण्यात आला. यश धुरी याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. देवस्थानचे मानकरी देवेंद्र धुरी यांचा तो पुतण्या होय. अधिक तपास संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम वंजारे, सचिन करवंजे करत आहेत. यश याच्या मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे

यश धुरी हा आंबोली सैनिक स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. तेथे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांने काही दिवसांपूर्वी नौदल व अग्निवीर परीक्षा दिली होती. मात्र, देशसेवेचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. या आकस्मिक घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवशी धुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT