ओरोस : बांगला देशात हिंदूंवर होणार्या अत्याचारप्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. बांगला देशी हिंदूंवर होणार्या अन्याय प्रश्नी कारवाई करा तसेच बेळगाव-महाराष्ट्र सीमा प्रश्नी केंद्र सरकारने दखल घ्यावी, बेळगाव महाराष्ट्रात विलीनीकरण करावे, अशी मागणी माजी आ. वैभव नाईक यांनी केली. याबाबतचे लेखी निेवेदन त्यांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर केले.
माजी आ. राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, हरी खोबरेकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, संग्राम प्रभूगावकर, कन्हैया पारकर, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदूंवर होणार्या या अत्याचारप्रकरणी निषेध नोंदविण्यात आला आहे.
बांगला देशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध आदी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यां पासून संरक्षण द्यावे, या सर्व अत्याचाराचा आम्ही अत्यंत कठोर शब्दात निषेध करतो.
वैभव नाईक म्हणाले, बांगला देश मधील हिंदूंच्या मंदिर आणि हिंदू समाजावर होणारा हा अन्याय असून केंद्र सरकारने अशा अत्याचाराबाबत बांगलादेश सरकारचे लक्ष वेधून हिंदू समाजावर होणार्या अन्यायाबाबत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडावे. बेळगाव-महाराष्ट्र एकत्रीकरणाचा प्रश्न गेली 56 वर्षे सुरू आहे. बेळगाव हे महाराष्ट्राचेच असून केंद्र सरकारने बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी पावले उचलली पाहिजे. येथील भूमिपुत्र, मंत्री या प्रश्नाबाबत काही निर्णय घेत नाहीत, हा हिंदू मराठी समाजावर होणारा अन्याय आहे. याकडे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.