आचरा: आचरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोर्यांचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मात्र यातील एकाही चोरीचा छडा आज पर्यंत लागलेला नाही. यामुळे महिला तसेच वृद्ध ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. परिसरात बांगलादेशी नागरीक व परप्रांतीय फेरीवाल्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. या बाबत पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी कार्यक्षेत्रातील चोर्यांचा येत्या महिन्याभारत छडा लावा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणू, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते वपंचक्रोशीतील ग्रामस्थांनीं येथील पोलिस अधिकार्यांना दिला.
परिसरातील चोर्यांचे वाढते प्रकार व या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना आलेले अपयश, या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आचरा पोलिस स्थानकावर धडक दिली. ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक विशाल चोरगे यांना याबाबत निवेदन दिले. भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, सोसायटी चेअरमन राजन गांवकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, वायंगणीचे माजी सरपंच हनुमंत प्रभू, चिंदर गाव तंटामुकक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, सिद्धार्थ कोळगे, बाळू वस्त, समीर बावकर, बंटी भोवर, अमित गांवकर, वायंगणी ग्रा. पं. सदस्या मालती जोशी, चंदू सावंत, राजन पांगे, मनोज हडकर, भाई घाडीगांवकर, मनोज वराडकर, कृष्णा घागरे तसेच आचरा, वायंगणी, चिंदर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवारी दोन अज्ञात चोरट्यांनी वायंगणी गावातील एका वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. अशाच प्रकारच्या घटना आचरा पंचक्रोशीत गेल्या वर्षभरात घडत असून यातील एकही चोरीचा तपास न लागल्याचा दावा करत ग्रामस्थांनी पोलिसांना जाब विचारला. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले वर्षभर दिवसाढवळ्या चोर्या होत आहेत. या चोर्यांचा आता पयर्ंत पोलिसांनी काय तपास केला? एकाही चोरट्याला पोलीस का शोधू शकले नाहीत? असे सवाल करत चोरी प्रकरणांच्या तपासाची आम्हाला माहिती द्या, अशी मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली.
चोर सापडत नसल्याने व चोर्या सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांमधील ही भीती दूर होण्यासाठी व पोलिसांचा मान राखला जावा यासाठी तपासाला गती मिळाली पाहिजे. आचरा पोलिस ठाणे हद्दीत चोर्या होत आहेत. पोलीस केवळ गुन्हे नोंदवत आहेत. ठाण्याचे अधिकारी सातत्याने बदलत आहेत व चोर्यांचा तपास तसाच पडून आहे, अशी स्थिती असल्याकडे श्री. चिंदरकर यांनी पोलिस अधिकार्यांचे लक्ष वेधले.
आचरा गावात मोठ्या प्रमाणात बांगला देशी वास्तव्य करून आहेत. ते दिवसा ढवळ्या फिरत आहेत.तसेच गावातील मशीदींच्या बाजूला काही अनोळखी व्यक्तींचा वावर दिसत आहे. याबाबत पोलिसांचे लक्ष वेधले असता आपण तक्रार द्या, मग कारवाई करतो असे पोलिसांकडून सांगितले जाते, असा आरोप राजन गावकर यांनी केला. बेकायदेशीर राहणार्या बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांची तक्रार कशाला हवी? असा सवाल त्यांनी केला. गावातीलच काही जागामालक बेकायदेशीरपणे या बांगलादेशींना राहण्यासाठी जागा देत आहेत, असा गंभीर दावा करत राजन गावकर यांनी संबधित जागा मालकांवर प्रथम कारवाई करावी, अशी मागणी केली.
चोरटी वाळू वाहतूक, मटका, जुगार खुलेआम आचरा तिठ्यावरून रात्री राजरोसपणे चोरटी वाळू वाहतूक सुरु आहे. तसेच परिसरात मटका, जुगार आदी बेकायदेशीर धंदे चालू आहेत. त्या मुळे चोर्यांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र पोलिस याकडे गंभीर्याने लक्ष देत नाहीत. काही पोलिस कर्मचारी अश्या प्रकारचे अवैध धंदे करणार्यांकडून हप्ते घेऊन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप राजन गावकर यांनी या वेळी केला.
आचरा व पंचक्रोशीतील चोर्यांचा तपास चालू आहे. शक्य तितके अंदाज पडताळून पाहिले जात आहेत, सीसीटीव्ही फुटेज घेतली जात आहेत. तपास कोठेही थांबलेला नाही, पोलीस चोरांच्या मागावर आहेत. आम्ही लवकरच या चोर्यांचा छडा लावण्यात यशस्वी होऊ.सागर खंडागळे,सहा. पोलीस निरीक्षक-आचरा