सिंधुदुर्गातील सर्वच बसस्‍थानकांचा होणार कायापालट! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील सर्वच बसस्‍थानकांचा होणार कायापालट!

कणकवली, तळेरे बसस्‍थानकांच्‍या डिझायनिंगचे काम सुरू; फोंडाघाट बसस्‍थानकाच्‍या इमारतीसाठी चार कोटींचा प्रस्‍ताव

पुढारी वृत्तसेवा

अजित सावंत

कणकवली : सिंधुदुर्गातील सर्वच बसस्‍थानकांचा येत्‍या काळात कायापालट होणार आहे. त्‍यात महामार्गावरील कणकवली, तळेरे आणि सावंतवाडी या तीन बसस्‍थानकांचा "बांधा, वापरा आणि हस्‍तांतरीत करा' अर्थात बीओटी तत्‍त्‍वावर विकास केला जाणार असून त्‍यासाठी आर्किटेक्‍टची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तसेच या तिन्‍ही बसस्‍थानकांचे डिझायनिंग करण्याचे काम सुरु आहे. तर फोंडाघाट बसस्‍थानकाच्‍या नव्‍या इमारतीसाठी शासनाकडे चार कोटीचा प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे. दीड कोटीच्‍या मंजूर निधीतून वैभववाडी बसस्‍थानकाच्‍या नव्‍या इमारतीचे कामही सुरु होणार आहे. तर जिल्‍हा मुख्याल सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ या बसस्‍थानकांच्‍या वाढविस्‍तारासाठी सुमारे पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील बसस्‍थानकांचा विचार करता महामार्गावरील कणकवली आणि सावंतवाडी बसस्‍थानकांच्‍या इमारती फारच जीर्ण झाल्‍या आहेत. महामार्गावरील तळेरे बसस्‍थानकही गेल्‍या अनेक वर्षापासून दुरुस्‍तीच्‍या प्रतीक्षेत आहे. ऑगस्‍ट २०२५ मध्ये राज्‍यशासनाने राज्‍य परिवहन महामंडळाचा तोटा भरुन काढण्यासाठी महामंडळाच्‍या अतिरिक्‍त जमिनींचा व्‍यापारी तत्‍त्‍वावर उपयोग करण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार सिंधुदुर्गातील मोक्‍याच्‍या ठिकाणी असलेल्‍या कणकवली बसस्‍थानकासह तळेरे, सावंतवाडी या बसस्‍थानकांचा बीओटी तत्‍त्‍वावर विकास केला जाणार आहे. या तिनही बसस्‍थानकातील जागा महामंडळाच्‍या आवश्यक गरजांसाठी वापरुन उर्वरित जागा व्‍यापारी तत्‍त्‍वावर ९८ वर्षांच्‍या भाडे पट्टा करारावर दिली जाणार आहे. त्‍यासाठी या तिन्‍ही बसस्‍थानकांचा सर्व्हे करुन आर्किटेक्‍टची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्‍यानुसार नव्‍या बसस्‍थानकांचे डिझाईन केले जात असल्‍याचे सिंधुदुर्ग एसटी विभागाचे विभागीय अभियंता अक्षय केंकरे यांनी सांगितले.

कणकवली बसस्‍थानकाबरोबर पेट्रोल पंपाच्‍या बाजूला असलेली एसटी महामंडळाची अधिकारी वसाहत इमारत तसेच विभागीय कार्यशाळेकडील विभागीय कार्यालय इमारत आणि तेथील कर्मचारी वसाहतीच्‍या इमारतीही याच बीओटी तत्‍त्‍वावर विकसित करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पहिल्‍या टप्‍प्यात बसस्‍थानकाचा विकास केला जाणार असून आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करुन नियुक्‍त केलेल्‍या विकासकामार्फत पावसाळ्यानंतरच प्रत्‍यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

फोंडाघाटचे बसस्‍थानक होणार अद्ययावत

कणकवली तालुक्‍यातील फोंडाघाट बसस्‍थानकाची इमारत जीर्ण झाली आहे. या बसस्‍थानकाच्‍या नव्‍या इमारतीसाठी राज्‍य शासनाकडे चार कोटीचा प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे. तर यापूर्वीच वैभववाडी नवीन बसस्‍थानक इमारतीसाठी राज्‍य शासनाकडून दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्‍याचेही काम पुढील कालावधीत हाती घेतले जाणार असल्‍याचे श्री .केंकरे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गनगरी बसस्‍थानकाचे रुपडे पालटणार

जिल्‍हा मुख्यालयात असलेले सिंधुदुर्गनगरी येथील बसस्‍थानक पुढील काळात आणखी आकर्षक आणि अद्ययावत होणार आहे. सध्या बसस्‍थानकाच्‍या छपराची शेड ही पत्र्याची आहे. त्‍यात बदल करुन अद्ययावत छप्पर व अन्‍य कामे केली जाणार आहेत. तर कुडाळ बसस्‍थानकाची इमारतही नवीन बांधण्यात आली आहे. परंतु प्रवाशांची बैठक व्‍यवस्‍था व अन्‍य कार्यालयांना जागा अपुरी पडत असल्‍याने त्‍याचा विस्‍तार केला जाणार आहे. कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी बसस्‍थानकांच्‍या वाढ विस्‍तारासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्‍ह्यातील अन्‍य बसस्‍थानकांचा विचार करता मालवणला नवीन बसस्‍थानक उभारण्यात आले आहे. तर देवगड, वेंगुर्ले या बसस्‍थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्‍यामुळे जी बसस्‍थानके जीर्ण झाली आहेत त्‍यांचा प्राधान्‍याने कायापालट केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्‍हा पर्यटन जिल्‍हा असून महामार्गासह जिल्‍ह्यातील सर्वच बसस्‍थानके अत्‍याधुनिक होणे आवश्यक होती. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने या बसस्‍थानकांचे रुपडे पालटण्याचे धोरण सध्या शासन आणि एसटी महामंडळाकडून राबवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT