बंगल्यातील कपाट फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : तीन बंद घरे फोडून ३१ तोळ्यांचे दागिने लंपास

चांदीच्या वस्तूंसह तीन हजार रुपये रोकड व दोन दुचाकीही लांबवल्या

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : माजगाव-मोरडोंगरी येथील बीएसएनएल टेलिफोन कॉलनीमध्ये बंद असलेली तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून धाडसी चोरी केली. सोमवारी पहाटे ही चोरीची घटना घडली. यातील सिद्धी रेडकर यांच्या एका घरातून कपाट फोडून चोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीचे ३१ तोळे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व तीन हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. नागपंचमी निमित्त रेडकर कुटुंबीय आपल्या मूळ कुडाळ या गावी गेले असता चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. या चोरी नंतर चोरट्यांनी बापू तुळसकर यांची व आणखीन एक दुचाकी मिळून दोन दुचाकी चोरून पलायन केले. घटनास्थळी सावंतवाडी पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर घरफोडी व दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सिद्धी रेडकर या आपले पती व मुलांसह नागपंचमीनिमित्त बंद करून रविवारी कुडाळ येथे गेले होते. सोमवारी पहाटे चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून लॉकर मध्ये ठेवलेले २५ लाख रुपयांचे ३१ तोळे सोन्याचे दागिने,३५ ग्रॅम चांदीच्या वस्तू व तीन हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तर त्यांचे शेजारी असलेले रामचंद्र सावंत, मारुती सावंत यांच्या बंगल्यात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. परंतू या दोन घरातून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. यातील सावंत कुटुंबीय हे मुंबई येथे असतात त्यामुळे त्यांची घरे बंदच असतात. सोमवारी सकाळी श्री. रेडकर यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी जाताना फिर्यादी सिद्धी रेडकर यांचे वडील बापू तुळसकर यांची सुपर स्प्लेंडर दुचाकी घेऊन पलायन केले.

सिद्धी रेडकर यांचा घराचा दरवाजाचा कोयंडा धारदार साधनाने कापून चोरांनी आत प्रवेश केला व घरातील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाट उचकटले. कपाटातील लॉकरमधून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. यामध्ये पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रे, तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे मंगळसूत्र, तीन तोळे वजनाचे सोन्याचे तोडे, आठ तोळे वजनच्या चार सोन्याच्या बांगड्या, तीन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन, तोडे, चेन, ५ सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याचे बाजूबंद, दीड तोळे सोन्याचा हार, आठ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट, दोन तोळे वजनाचे सोन्याचे कर्णफुले चार जोड, सहा ग्रॅम सोन्याची साखळी, ३५ ग्रॅम चांदीचे दागिने, स्प्लेंडर दुचाकी पंधरा हजार असे एकूण दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय याच परिसरातून आणखीन एक दुचाकी चोरट्यांनी सोबत नेली आहे.

याच परिसरातील रामचंद्र सावंत आणि मारुती सिताराम सावंत यांच्या घरातही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्यांच्या घरातून किती सामान चोरीस गेले याची माहिती समजू शकली नाही. ते मुंबई येथे राहत असल्याने ते आल्या नंतर माहिती मिळणार आहे. घटनास्थळी संध्याकाळी अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी भेट देत पाहणी केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहापो निरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी भेट घेत चोरट्यांचा शोध घेतला.

घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले असून, संशयित चोरट्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. या परिसरात तसेच रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी फुटेज सापडले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरटे बाहेरील राज्यातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT