कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणारे पिंगुळी (ता. कुडाळ) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग युनिटने कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावरील रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३५ वर्षे, व्यवसाय: वकील) यांनी आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी तलाठी सजा पिंगुळी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी जितेंद्र खेताडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार वकिलांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग येथे याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील तलाठी कार्यालयात लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तलाठी खेताडे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. कार्यालयात भेट न झाल्याने तक्रारदारांनी तलाठी खेताडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. खेताडे यांनी तक्रारदारांना कुडाळ-वेंगुर्ला रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ बोलावले. त्या ठिकाणी ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. आरोपी लोकसेवक जितेंद्र खेताडे यांना सायंकाळी 4 वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी तलाठी जितेंद्र काळू खेताडे यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उप अधीक्षक श्रीम. संगिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक दिपक माळी, पोलीस हवालदार प्रीतम कदम, महेश जगताप, नागेश खोत, योगेश मुंढे, भूषण नाईक आणि स्वाती राऊळ यांचा समावेश होता.