पिल्लासाठी म्हशीने दिली बिबट्याशी झुंज! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| पिल्लासाठी म्हशीने दिली बिबट्याशी झुंज!

पोंभुर्ले-घाणेचीवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कासार्डे : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले-घाणेचीवाडी येथे बिबट्याने रेडकावर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मात्र, आपल्या पिल्लावर आलेले संकट पाहून म्हशीने बिबट्यावर प्रतिहल्ला करत त्याच्याशी जोरदार झुंज दिली. म्हशीच्या या आक्रमक प्रतिकारामुळे अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागली. या झटापटीत रेडकू जखमी झाले तरी आपल्या पिल्लाचा जीव म्हशीने काळाच्या जबड्यातून परत आणला.

पोंभुर्ले-घाणेचीवाडी येथील वेदांगी प्रभू-पेंढारकर यांची जनावरे रविवारी सकाळी घराशेजारील कलम बागेत चरत होती. दरम्यान स. १० वा. च्या सुमारास परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लहान रेडकावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जनावरांमध्ये गोंधळ उडाला व ती सैरावैरा पळू लागली. मात्र आपले पिल मृत्यूच्या छायेत असल्याचे पाहून त्याच्या आई असलेल्या म्हशीने आपली सर्व शक्ती एकवटत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली.

पिल्लाच्या बचावासाठी तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावत बिबट्याला जोरदार प्रतिकार केला. अखेर म्हशीच्या या आक्रमक प्रतिहल्ल्यामुळे बिबट्याला माघार घ्यावी लागली. या झटापटीत रेडकू जखमी झाले; मात्र म्हशीने त्याला आपल्या सोबत सुरक्षित घरी आणले.आपल्या पिल्लाच्या बचावासाठी म्हशीने बिबट्याशी दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. मातृत्वाची ताकद यातून अधोरेखित झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT