देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बोरसूत येथे जखमी अवस्थेमध्ये गुरुवारी सायंकाळी बिबट्या आढळून आला. ग्रामस्थांनी वन विभागाला कळवताच वन विभागाने तत्काळ बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. उपचाराला पुणे येथे नेत असतानाच या बिबट्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा बिबट्या जखमी असल्याने जास्त हालचाल करत नव्हता. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली. बिबट्या जखमी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून त्याच्या हालचाली मर्यादित होत्या. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवली.
तालुक्याचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, सुरज तेली, सुप्रिया काळे, ग्रामस्थांमधून शेखर खामकर यांनी आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला पकडले. पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असतानाच आंबा घाटातच बिबट्या मृत झाला. बिबट्या हा नर जातीचा होता. पाच वर्षे वयाचा पूर्ण वाढीचा बिबट्या होता. या बिबट्याचे शवविच्छेदन केले असता. बिबट्याला सर्प दंश झाला होता. यामुळे हा बिबट्या जखमी होऊन अशक्त झाला होता असे तपासणीतून निष्पन्न झाले. या बिबट्याचे शुक्रवारी सकाळी दहन करण्यात आले. वन्यप्राणी आढळून आल्यास घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे व स्वतःहून जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.