ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते खा. नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीची घोषणा केली होती. रविवारी सकाळी त्यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युलाही जाहीर केला. मात्र, हा फॉर्म्युला जाहीर होताच अवघ्या काही तासांत भाजपच्या 43 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. यामध्ये ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, मंडळ अध्यक्ष, जि. प. माजी सदस्य अशा विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राजीनामा देणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद ऊर्फ भाई सावंत यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, मी ओरोस मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही, माझी पक्षातील कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही. तरी माझा हा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा, असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती भाई सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या सोबतच ओरोसमंडळ मधील भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्यव जि. प. माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह ओरोस मंडळामधील बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख आदी मिळून 43 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे. जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर होताच भाजपमधील या राजीनामा नाट्यामुळे जिल्हा भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे .