भंगसाळ नदीपात्रात दुचाकी कोसळली; आई व मुलगा जखमी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : भंगसाळ नदीपात्रात दुचाकी कोसळली; आई व मुलगा जखमी

भंगसाळ बंधाऱ्यावरील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदी बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना दसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वा. च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडले. मात्र, शेलटेवाडी ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. दुखापत झाल्याने दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ऐनवेळी मदतीला धावून आलेल्या शेलटेवाडी ग्रामस्थांमुळे आई-मुलाचे प्राण वाचले.

शहरातील हॉटेल गुलमोहोरनजीक असलेल्या भंगसाळ बंधाऱ्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी साठवणुकीसाठी लोखंडी प्लेट्स टाकण्याचे काम सुरू होते. या प्लेट्स बंधाऱ्यावर ठेवल्या आहेत. याचदरम्यान बंधाऱ्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. यावेळी दुचाकीस्वार निखिल नारायण सावंत (१९) व मागे बसलेली त्याची आई नेहा नारायण सावंत (४५, रा. आंबडपाल) हे दोघेही नदीपात्रात पडले. दुचाकी नदीपात्रात कोसळताच त्यांनी आरडाओरडा केला.

याची माहिती मिळताच शेलटेवाडीतील प्रसाद शेलटे, नारायण शेलटे, अक्षय शेलटे आणि उमेश शेलटे, महेश शेलटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत दोघांनाही नदीपात्रातून बाहेर काढले. दोघांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नेहा सावंत यांना पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली. नदीपात्रात पडलेली दुचाकी ग्रामस्थांनी जेटीच्या मदतीने बाहेर काढली. या बंधाऱ्यावरून दुचाकीस्वारांची नेहमीच वर्दळ असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT