कणकवली ः देवगड-जामसंडे येथून कणकवलीकडे सेंट्रिंग कामासाठी मोटारसायकलवरून येत असताना बिडवाडी हायस्कूलच्या अलीकडे एका वळणावर समोरून एसटी आल्याने मोटारसायकलस्वाराने ब्रेक लावला. मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला मोटारसायकलच्या मागे बसलेला सुनील मल्हारी भिसे (19, सध्या रा. जामसंडे देवगड, मूळ रा. विजापूर) याचा उपचारादरम्यान दुपारी 2च्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास कणकवली- बिडवाडी मार्गावर घडला.
कणकवली आगाराचे चालक बाबाजी गणपत राणे हे एसटी घेऊन कणकवली साळशी मार्गे शिरगाव जात होते. सकाळी 10.5 च्या सुमारास बिडवाडी हायस्कूलच्या अलीकडे वळणावर समोरून भरधाव येणारा मोटारसायकलस्वार अरुण परमेश्वर शेंडगे (22, रा. जामसंडे- देवगड, मुळ विजापूर) याने मोटरसायकलला ब्रेक केला असता मोटरसायकल रस्त्यावर फिरली आणि पडली. त्याचवेळी एसटी चालक बाबाजी राणे यांना आरशातून मोटरसायकलस्वार व त्याच्या मागे बसलेला एकजण रस्त्यावर पडलेले दिसले म्हणून त्यांनी एसटी थांबविली. वाहकाच्या मदतीने एका खाजगी गाडीने जखमी सुनील भिसे याला व स्वार अरूण शेंडगे यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. पोलिसांनाही खबर देण्यात आली. या अपघातात गंभीर जखमी झालेला सुनील भिसे याच्या बरगडीला गंभीर दुखापत होवून अंर्तगत रक्तस्त्रावाने त्याचा दुपारी 2 वा. च्या सुमारास मृत्यू झाला. विशेष म्हणजे मोटरसायकलस्वार अरूण शेंडगे याला फारशी दुखापत झाली नाही. या अपघाताची खबर एसटी चालक बाबाजी राणे यांनी दिली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.