बांदा : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा बांदा ग्रामस्थांना कोणताही फायदा होणार नसून, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला बांदा ग्रामस्थांचा एकमुखी विरोध असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. महामार्गाची अधिसूचना ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आली असली तरी आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर ती लावण्यात आल्याने आता आक्षेप कुठे नोंदवायचा, असा सवाल ग्रामस्थांनी केला.
सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रा. पं. सदस्य आबा धारगळकर, बाळू सावंत, जावेद खतीब, साई काणेकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, देवल येडवे, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असणकर, तलाठी फिरोज खान यांच्यासह कृषी, आरोग्य व तिलारी कालवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामसभेला १५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेत अरुण मोर्ये यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका मांडली. या मार्गाबाबत ९ जून रोजी प्रसिद्धी करण्यात आली असून ९ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. बांदा गावातून १५९ हरकती मागविण्यात आल्या असून महामार्गासाठी सुमारे २१४ एकर जमीन जाणार आहे. यामध्ये बांदा ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळ ब्राह्मण देवस्थानच्या जागेचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या देवस्थानाशी बांदावासीयांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली गावच्या श्रद्धास्थानांवर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा आणू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी ग्रामस्थांनीही शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध दर्शवत एकमुखी विरोधाचा ठराव घेण्याची मागणी केली. त्यानुसार हा ठराव मंजूर करण्यात आला.
पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागेचा शोध
ग्रामसभेत पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासाठी जागेचा शोध सुरू असून सोसायटीजवळील जागेचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. गुरुनाथ सावंत यांनी दोन जागा सुचविल्या. गजानन गायतोंडे यांनी स्मशानभूमीच्या जागेचे सर्वेक्षण करून तेथे अतिक्रमण झाले आहे का, याची तपासणी करण्याची मागणी केली. सुशांत पांगम व गायतोंडे यांनी स्मशानभूमी परिसरात कचरा टाकला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यास परवानगी आहे का? असा सवाल त्यांनी केला.
गावातील नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे द्यावा, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सरपंचांनी सांगितले. ग्रामसभेने सर्वानुमते पाच हजार रुपये दंड आकारण्यास मंजुरी दिली.
गणेशोत्सव नियोजनावर चर्चा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणी, रस्ते, आरोग्य, वीज आणि बाजारपेठेतील नियोजनावर चर्चा करण्यात आली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. उपसरपंच रत्नाकर आगलावे यांनी याबाबत एका सामाजिक संस्थेसोबत चर्चा झाली असून आवश्यक नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. गुरुनाथ सावंत यांनी सटमट येथील तपासणी नाक्यावर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली. कोणाच्या विरोधामुळे विकासकामांना विरोध करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गालगत बेकायदेशीर पार्किंग, वाहने, दुकाने व गाळे हटविण्याबाबतही चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता महसूल विभाग तसेच रस्ते बांधणी करणाऱ्या संस्थांकडून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत गाळे व दुकाने हटवावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
आरोग्य, वीज विभागाच्या कारभारावर नाराजी
वीज कार्यालयाच्या कारभाराबाबत विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी हेमंत दाभोलकर यांनी केली. ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून ग्रामपंचायतीला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
विविध ठराव मंजूर
‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमांतर्गत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची पुनर्रचना करून अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सावंत यांची निवड करण्यात आली. नवीन समितीची स्थापना करून अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली. बांदा शहराला पोलीस पाटील पद नसल्याचा मुद्दा फिरोज खान यांनी उपस्थित केला. पद अस्तित्वात असेल तर ते भरण्यात यावे; अन्यथा पद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली. उद्योग विचारवंत समिती स्थापन करण्याबाबत तसेच विविध विकासकामांवरही चर्चा झाली.बांदा शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबतही ग्रामसभेत ठराव घेण्यात आला.