बांदा गडगेवाडी येथील ‌‘कल्पना ट्रेडर्स‌’ हार्डवेअर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालेले साहित्य.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : बांद्यात हार्डवेअरचे दुकान जळून खाक; सुमारे 80 लाखांचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

बांदा : बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या ‌‘कल्पना ट्रेडर्स‌’ या हार्डवेअर दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून दुकानातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत दुकान मालक दयालाल पटेल यांचे सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

मंगळवारी रात्री सुमारे 12.30 वा.च्या सुमारास दुकानातून धूर व ज्वाळा बाहेर येताना स्थानिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण दुकानाला आपल्या कवेत घेतले. दुकानात मोठ्या प्रमाणात पीव्हीसी पाईप, हार्डवेअरचे लोखंडी व लाकडी साहित्य, फिटिंग साहित्य, सॅनिटरी वेअर, प्लायवूड, पेंट तसेच अन्य बांधकाम साहित्य साठवलेले असल्याने आग झपाट्याने भडकली. या आगीत दुकानातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये एक कॉम्प्युटर, चेकबुक तसेच खरेदी-विक्रीची महत्त्वाची कागदपत्रे व बिले यांचाही समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. सावंतवाडी येथून पहिला अग्निशमन बंब सुमारे 2.30 वा.च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर कुडाळ, वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी पोहोचले. चारही ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी समन्वय साधत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

आगीची तीव्रता मोठी असल्याने जवळपास पाच तासांहून अधिक काळ आग विझवण्याचे काम सुरू होते. अखेर पहाटे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगीची माहिती मिळताच बांदा व परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी धावून आले आणि मदतकार्य केले. स्थानिकांनी पाणी आणून देणे, परिसर मोकळा करणे तसेच अग्निशमन दलाला आवश्यक मदत पुरविणे अशा प्रकारे सहकार्य केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास मोठी मदत झाली. या मदतकार्यात उपसरपंच रत्नाकर आगलावे, श्रीयाल धारगळकर, मिलिंद सावंत, अर्णव स्वर, दीपक पडवळ, प्रथमेश पडवळ, जय सावंत, मयुरेश महाजन, गौरव सावंत, प्रणव देसाई, काका मुळये, भैय्या साळगावकर, सौरभ आगलावे, साहिल आगलावे, अंकुर केसरकर, बापू मांजरेकर, साहिल वीर, सर्वेश गोवेकर, विनोद सावळ, जावेद खतीब, बाळू सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. जवळपास 25 वर्षांपासून सुरू असलेले हे दुकान परिसरातील नागरिकांसाठी हार्डवेअर साहित्याचा महत्त्वाचा आधार होते. या घटनेमुळे बांदा व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर बांदा शहरात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या मते, बांद्यात अग्निशमन सुविधा उपलब्ध असती तर आग लवकर नियंत्रणात येऊन नुकसानाचे प्रमाण कमी झाले असते. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT