बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा राष्ट्रपती भवनात प्रयोग 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा राष्ट्रपती भवनात प्रयोग

मालक दिनेश गोरे यांची माहिती; स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कोकणची सुमारे आठशे वर्षांची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळ, कवठी-कुडाळने मानाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. या मंडळाने विविध राज्यांमध्ये दशावतारी नाट्यप्रयोग सादर करून गौरव प्राप्त केला आहे. १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात या मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ रविवारी दिल्लीला रवाना झाले. सलग सातव्यांदा दिल्ली दौरा करणाऱ्या या मंडळाला राष्ट्रपती भवनात दशावताराचा नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी मिळाली आहे. या निमित्ताने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते मंडळाचा सन्मान होणार असल्याची माहिती मंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी दिली.

बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाने आतापर्यंत पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उज्जैन, इंदोर, सिंहस्थ कुंभमेळा, धुळे, नाशिक, पंचवटी, शिर्डी, पंढरपूर, अमरावती, विदर्भ, तिरुअनंतपुरम, केरळ, कर्नाटक, गोवा, पुणे, मुंबई आदी विविध ठिकाणी दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले आहेत. ‘भारत रंग’ महोत्सवासह विविध राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्येही मंडळाने सहभाग घेतला आहे.

कोकणातील आद्य लोककला म्हणून दशावताराचा वारसा जपणाऱ्या गोरे घराण्याची ही दहावी पिढी आहे. पौराणिक तसेच महाभारतावर आधारित नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम मंडळ सातत्याने करीत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर या मंडळाची ओळख निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT