अणाव ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : अणाव ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप

उपसरपंच आदिती अणावकर यांच्या विरुद्ध ७ सदस्यांचे बंड

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ : अणाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटातच मोठी ठिणगी पडली असून, उपसरपंच आदिती अभय अणावकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत ७ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचे रणशिंग फुंकले आहे. सदस्यांना विश्वासात न घेणे आणि विकासकामांच्या ठरावांना वाटाण्याच्या अक्षता लावणे, असा आरोप करत २९ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे हे अविश्वासाचे निवेदन दिले होते. आता या प्रकरणाचा अंतिम निकाल शुक्रवारी होणाऱ्या 'खास ग्रामसभेत' लागणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष अणावकडे लागले आहे.

अणाव उपसरपंच आदिती अणावकर या सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत. वेळोवेळी होणाऱ्या मासिक सभांमध्ये सदस्यांनी मांडलेल्या लोकहिताच्या ठरावांना त्या सहकार्य करत नाहीत, असा गंभीर आरोप रावजी जिकमडे यांच्यासह इतर ७ सदस्यांनी केला आहे. लोकशाहीत बहुमताचा आदर होत नसल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाल्याने अखेर त्यांनी तहसीलदारांचे दार ठोठावले.

विशेष सभेत ९ सदस्यांची उपस्थिती

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (१) नुसार ५ मे रोजी अणाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रावजी जिकमडे, गजानन कुलकर्णी, मृणाल परब, सुवर्णा परब, श्रद्धा दळवी, महिमा जिकमडे, नंदकिशोर पारकर, लीलाधर अणावकर आणि स्वतः उपसरपंच आदिती अणावकर असे एकूण ९ सदस्य उपस्थित होते.

या सभेत अविश्वास ठरावाबाबतची तांत्रिक कार्यवाही सर्वांना समजावून सांगण्यात आली. या सभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर, त्यांच्या आदेशानुसार आता शुक्रवारी या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. या महत्त्वाच्या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कुडाळचे गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपसरपंचपद वाचवण्यासाठी एका बाजूने मोर्चेबांधणी सुरू असताना, दुसऱ्या बाजूने सातही सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या या खास सभेत उपसरपंच आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी होतात की त्यांना पायउतार व्हावे लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT