ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्यातील इयत्ता बारावी व दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकार्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अति.पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. राज्यस्तरावरील मोहिमेमध्ये क्रमांक पटकाविलेल्या अधिकार्यांचा मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली. मी तेव्हाच ठरविले होते, की या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या अधिकार्यांनी उत्कृष्ट काम केले असेल, त्यांचा मी जिल्हावासियांच्या वतीने आभार मानणार आणि त्यांचा सत्कार करणार. तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्या मागे पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे. जनतेचे सेवक म्हणून नागरिकांना सेवा द्या. चांगले काम करणार्यांना मी नेहमीच शाबासकी देणार. तुम्ही चांगलं काम कराल, तर जिल्हावासीय तुमच्या सोबत सदैव आहोत. जनतेच्या हिताचे निर्णय घ्या, विविध क्षेत्रात नव नवीन प्रयोग करा, जगामध्ये तसेच देशामध्ये जे चांगलं आहे, ते तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणा. तुम्ही अशाच पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून चांगले काम करत जा, काहीतरी नवीन घडवा, काहीतरी नवीन प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याला पुढे घेऊन जा, असेही ते म्हणाले. पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. म्हणून खासदार राणे यांनी देखील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखणे, जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही फार बारकाईने लक्ष देत आहोत. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे, तो त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा सत्कार झालेला आहे. तुम्ही दहावी-बारावी मध्ये एवढे चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, तुम्ही पुढेही अशाच चिकाटीने अभ्यास करत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना विश्वास देतो की तुमच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची दालने आम्ही निश्चितपणे उघडे करू. त्या दिशेने आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले. अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे व पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनीही मार्गदर्शन केलेे. यावेळी दहावी व बारावीत जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचवला पाहिजे, त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. कोकणातल्या संपूर्ण निकालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही राणे यांनी नमुद केले.