जामसंडे : पत्रकार परिषदेत बोलताना आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके व इतर. (छाया : वैभव केळकर) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| राजकारणात आयत्या खुर्चीवर बसलेल्यांनी संघर्षाची भाषा शिकवू नये

शेतकऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ; आंबा-काजू व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांचा अजित गोगटे यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

देवगड : मी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक आहे. माजी आमदार आप्पासाहेब गोगटे, माधव भांडारी, निशिकांत साटम, सुधीर जोशी, सदाशिव ओगले यांनी संघर्ष केला. त्यातून देवगडमध्ये भाजपा पक्ष उभा राहिला. सन २०१४ नंतर राजकारणात जे आयत्या खुर्चीवर बसले, त्यांनी कधीही संघर्ष केला नव्हता, त्यामुळे संघर्ष कसा करावा, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. शेतकऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिला.

जामसंडे येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ढोके यांनी माजी आ. अजित गोगटे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. गणेश गावकर, प्रशांत शदे, चंद्रकांत गोईम, किरण टेंबुलकर, गणेश वाळके, तेजस मामघाडी, बाबू लाड, जयवंत मिठबावकर, अजय तेली,हरीश्चंद्र गोडे, दत्तगुरू सोमले, संकेत लब्दे, सचिन परब, हितेंद्र करंगुटकर आदी उपस्थित होते.

काका ढोके म्हणाले, मुंबईतील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन बळजबरीने मोडीत काढले.बागायतदार मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भावना मांडणार होते, मात्र त्याआधीच बागायतदारांची धरपकड करून आंदोलन मोडीत काढले याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे ही प्रतिक्रिया उमटली.

यावर माजी आ. ॲड.अजित गोगटे यांनी हे आंदोलन बागायतदारांचे नसून ठाकरे शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचे होते असे विधान करून बागायतदार शेतकऱ्यांची थट्टा केली. त्यांचा विधानावरून ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या त्यांनी वाचाव्यात .त्यावरून तुमच्याबाबत शेतकऱ्यांचा काय भावना आहेत हे समजेल. त्यावेळी संघर्षातून आम्ही इथेपर्यंत पोहचलो असे विधान केले, मात्र सन २०१४ नंतर स्वार्थासाठी खुर्चीत बसलात. तुम्ही भाजपसाठी कधीही संघर्ष केला नाही. माजी आमदार आप्पासाहेब गोगटे, सुधीर जोशी, माधव भांडारी, निशिकांत साटम, सदाशिव ओगले यांनी पक्षासाठी खरा संघर्ष करून भाजपा पक्ष देवगड तालुक्यात व जिल्ह्यात उभा केला. आपणही संघाचे कार्यकर्ते म्हणून काम केले आहे.यामुळे संघर्षाची भाषा करणे चुकीचे आहे, असे श्री.ढोके म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT