देवगड : नसबंदी केंद्राची पाहणी करताना नागरिक. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Stray Dogs| नसबंदीसाठी पकडलेल्या कुत्र्यांची हेळसांड होत असल्याचा आरोप

देवगड युथ फोरमसह नागरिकांचा आक्षेप; स्वच्छता सभापती व मुख्याधिकाऱ्यांकडून दखल

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेत नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनातील घंटागाडीचा वापर कुत्र्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जामसंडे येथील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रात एका खोलीत १९, तर दुसऱ्या खोलीत १२ कुत्र्यांना बंदिस्त करून ठेवल्याचे आणि त्याच ठिकाणी नवजात पिल्लेही असल्याचे निदर्शनास आले. केंद्रातील अस्वच्छता आणि कुत्र्यांच्या होणाऱ्या कथित हेळसांडीबाबत युथ फोरम-देवगड संस्थेसह स्थानिक जागरूक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी आणि मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी केंद्राला भेट देत पाहणी केली.

देवगड नगरपंचायत क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम एका खासगी एजन्सीमार्फत सुरू आहे. मंगळवारी रात्री नगरपंचायतीच्या घंटागाडीतून कुत्र्यांना केंद्राकडे नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह सोहम पारकर, श्रुती माणगांवकर, दीपक जानकर, गोविंद माळी, जितेश मोहिते, ओंकार सारंग, तौकिर शेख, ऋत्विक धुरी तसेच स्थानिक ग्रामस्थ नाना सारंग, रवींद्र चिंदरकर आदींनी केंद्राला भेट दिली.

यावेळी संबंधित एजन्सीच्या कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाला काही दिवसांपूर्वी आग लागून नुकसान झाल्याने नगरपंचायतीच्या घंटागाडीचा वापर केला जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, कचरा व्यवस्थापनासाठी असलेल्या घंटागाडीचा वापर नसबंदी मोहिमेसाठी करणे चुकीचे असल्याचे सांगत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित एजन्सीने या मोहिमेसाठी स्वतंत्र अथवा भाडेतत्त्वावर वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्राची पाहणी केली असता एका खोलीत १९ तर दुसऱ्या खोलीत १२ कुत्रे बंदिस्त असल्याचे आढळले. त्याच खोल्यांमध्ये नवजात पिल्लेही ठेवली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, क्षमतेपेक्षा अधिक कुत्र्यांना एकाच खोलीत ठेवल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गरोदर कुत्रींनाही पकडून वाहनांमध्ये कोंबण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. त्यानंतर घटनास्थळी आलेले स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी घंटागाडीच्या वापराबाबत आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले. मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनीही ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत केंद्राची पाहणी केली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दैनंदिन स्वच्छता, कुत्र्यांना देण्यात येणारे खाद्य आणि इतर कामांची लेखी नोंद ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कुत्र्यांना एका खोलीत ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.

कुत्र्यांना ठेवण्यासाठी उपलब्ध पिंजरे नादुरुस्त असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर सभापती बुवा तारी यांनी पिंजऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. पिंजरे दुरुस्त करून त्यांच्या क्षमतेनुसारच कुत्र्यांना ठेवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, नसबंदी मोहिमेसाठी घंटागाडीचा वापर होत असल्याबाबत मुख्याधिकारीही अनभिज्ञ असल्याचे चर्चेदरम्यान समोर आले. नगरपंचायतीने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत, तसेच कचरा व्यवस्थापनासाठी असलेल्या घंटागाडीचा वापर त्याच कामासाठी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. केंद्रातील स्वच्छता, कुत्र्यांची सुरक्षितता आणि योग्य देखभाल याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवदत्त माने यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT