ओरोस : गेल्या तीन वर्षांपासून चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाच्या विद्युतीकरणाची समस्या आता मार्गी लागणार आहे. विमानतळावरील विद्युतीकरण समस्येसह लाईन शिफ्टिंग व रुपांतरण कामासाठी जिल्हा नियोजनमधून 2 कोटी 37 लाख 57 हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. या विमानतळाकरिता एमएसईबीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सिंधुदुर्ग विमानतळाला वीज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुलेर्र् तालुक्यातील महावितरणच्या पाट फिडरवरून जाणार्या 11 केव्ही लाईनचे शिफ्टिंग व रुपांतरणासाठी जिल्हा नियोजनमधून 2 कोटी 37 लाख 57 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजनमधून या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
विमानतळ सुरू होवून तीन वर्षे झाली तरी तेथील नाईट लँडिंगचा प्रश्न रेंगाळला होता. तसेच विद्युतीकरणाच्या अनुषंगाने अनेक समस्या प्रलंबित होत्या. यासाठी वीज वाहिणनी शिफ्टिंगसाठी मोठा खर्च होता. पालकमंत्री राणे यांनी या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी व प्रशासकीय मान्यतेसाठी अधिकार जिल्हाधिकार्यांना दिले होते.
या कामाला महावितरणने तांत्रिक मान्यता देऊन निधीसाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा नियोजन समितीने 2 कोटी 37 लाखांना मान्यता दिली होती. यासाठी महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक काम पाहणार आहे.
सिंधुदुर्ग विमानतळावरून सद्यस्थितीत केवळ सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. मात्र यापूर्वी दैनंदिन असलेली महत्त्वाची सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा गेले 6 महिन्यांपासून बंद आहे. या बरोबरच या पूर्वी सुरू असलेल्या सिंधुदुर्ग- हैदराबाद व सिंधुदुर्ग- बेंगलोर या विमानसेवाही सध्या बंद आहेत. तर जळगाव, नांदेड, चेन्नई आदींसह अन्य काही नवीन मार्गांवर विमानसेवा प्रस्तावित आहे. या सर्व विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबईत ‘फ्लाय 91’ या विमान कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा केली. येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा प्राधान्याने सुरू करण्याचे कंपनीने मान्य केले आहे.