ओरोस : केंद्रीय नीती आयोगाचा सिंधुदुर्ग दौरा हा जिल्ह्याच्या प्रगतीच्या द़ृष्टीने चांगला प्रभाव टाकणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा जिल्ह्यांमध्ये ‘एआय प्रणाली’ विकसित करण्यासाठी नीती आयोगाला सूचना दिल्या आहेत. या दहा जिल्ह्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘एआय प्रणाली’ मार्गदर्शक मॉडेल म्हणून वापरण्यात येणार आहे. यासाठी नीती आयोगाचे सदस्य जिल्हा प्रशासनाकडून या ‘एआय मॉडेल’ची माहिती घेत आहेत. यामुळे सिंधुदुर्गचे ‘एआय मॉडेल’ देशातील प्रशासकीय कारभारासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय नीती आयोग कमिटी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर आली आहे. आयोगाचे डॉ. देवव्रत त्यागी, श्रीमती विदिशा दास आदींचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य दोन दिवस सिंधुदुर्ग दौर्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आपल्या प्रशासकीय कामकाजाम ‘एआय प्रणाली’चा वापर सुरू केला आहे. संपूर्ण देशात प्रशासकीय कामकाजात ‘एआय’चा वापर करणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असून, जिल्ह्याची ही ‘एआय’ प्रणाली देशासाठी पायलट प्रोजेक्ट ठरली आहे. नीती आयोगाचे सदस्य जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये या प्रणालीचा होणारा वापर ही कमिटी अभ्यास करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या नीती आयोगाच्या दौर्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव चर्चिले जात आहे. ही बाब सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. यापूर्वी देशातील सर्वाधिक साक्षर, पर्यटन व स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची देशात ओळख होती. आता प्रशासकीय कामकाजासाठी ‘एआय प्रणाली’ विकासीत करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा नावा रूपास येणार आहे. नीती आयोगाच्या या दौर्यातून सिंधुदुर्ग च्या प्रतिमेवर चांगला प्रभाव पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन या समितीच्या स्वागतासाठी सज्ज असून सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्षही स्थापन केला असल्याचे ना. राणे म्हणाले.
जिल्हा दौर्यावर आलेल्या नीती आयोग कमिटीचे डॉ. देवव्रत्त त्यागी, श्रीमती विदिशा दास यांनी गुरूवारी पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामपंचायत सह काही विभागांना भेटी देऊन तेथे एआय प्रणालीचा कशा पद्धतीने वापर केला जातो, ग्रामीण विकासासाठी त्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो, याबाबत सविस्तर माहिती घेतली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जि. प. बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी त्यांना याबाबत माहिती दिली.