जिल्ह्यात ‘एआय’ आधारित स्मार्ट शेती प्रकल्पाचा शुभारंभ 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जिल्ह्यात ‘एआय’ आधारित स्मार्ट शेती प्रकल्पाचा शुभारंभ

पहिल्या टप्प्यात आठही तालुक्यांमधील ४०० शेतकऱ्यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू फळ पिकांवर परिणाम झाला आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आंबा-काजू उत्पादकांसाठी ‘एआय’ आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येत असून हा उपक्रम सिंधुदुर्गच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री राणे यांच्या हस्ते झाला. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून हा दोन वर्षांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे.

मंत्री राणे म्हणाले, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि शासन स्तरावर विविध शाश्वत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोरील आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुठेही मागे राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४.५० लाख रुपयांचा टप्पा पार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा उपक्रम पारदर्शकपणे राबविला जाईल. शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील कोणत्याही ठिकाणची शेती व्यवस्थापित करणे शक्य होत आहे. उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि सनियंत्रणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ऊस उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा झाला असून, त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा उपक्रम असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्या सह जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था, प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत केले जाणार मार्गदर्शन

आंबा आणि काजू पिकांशी संबंधित विविध प्रकारची माहिती एकत्रित करून एआय प्रणालीच्या माध्यमातून तिचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याआधारे पिकांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना व मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. या माध्यमातून उत्पादनात वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट असून, कृषक मोबाईल प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठी भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT