जलस्रोतांतील पाण्याचा वापर करून शेतरोप वाचवताना शेतकरी.  छाया : अनिकेत उचले
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : पावसाची ओढ; भात रोपे सुकून जाणण्याची भीती

भात शेतीसमोर संकटाची चाहूल

पुढारी वृत्तसेवा

अनिकेत उचले

कणकवली : तळकोकणात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी भात पेरणी पूर्ण केली. त्यानंतर ६ जूनपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने पाऊस जोरदार बरसेल, अशी आशा होती. मात्र, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनला अचानक ब्रेक लागल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. पावसाअभावी पेरणी केलेली भातरोपे वाळून जाण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीसह शेती कामांना वेग दिला होता. अनेक ठिकाणी भात पेरणी पूर्ण झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील ओलावा कमी झाला आहे. परिणामी भाताची कोवळी रोपे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. शेतकरी विहिरी, बोरिंग,तलाव तसेच अन्य जलस्रोतांतील पाण्याचा वापर करून ही रोपे वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी पाऊस आणि उन्हाचा लपंडाव सुरू आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी त्यानंतर लगेचच कडक ऊन पडत असल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. पावसाचा जोर कमी असल्याने नदी-नालेही पूर्णक्षमतेने प्रवाहित झालेले नाहीत. जलस्रोतांतील पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या गंभीर भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT