आचरा : महावितरणचे करायचं काय.... खाली डोकं वर पाय... मुर्दाबाद... मुर्दाबाद महावितरण मुर्दाबाद... अशा घोषणा देत आचरे पंचक्रोशी ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी वीज कार्यालयावर धडक देत जाब विचारला. सोमवारी दिवसभर 'मेंटेनन्स'च्या नावाखाली वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात ग्रामस्थांनी कासावीस होत दिवस काढला, मात्र सोमवारी संध्याकाळी सुरू झालेली वीज काही वेळात पुन्हा गायब झाली ती थेट मंगळवारी सकाळपर्यंत आलीच नाही. या संतप्त प्रकारामुळे आक्रमक ग्रामस्थांनी मंगळवारी सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली. स. ९ वा.पासून सुरू झालेले हे आंदोलन सुमारे ५ तास, म्हणजेच दु. ३ वाजेपर्यंत सुरू होते.
मंगळवारी ग्रामस्थ आचरा बाजारपेठ येथील महावितरण कार्यालयात पोहोचले. तिथे आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एकही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हता. तासभर वाट पाहूनही कोणी न आल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत थेट कार्यालयाला कुलूप ठोकले.
वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर
त्यानंतर घटनास्थळी आलेले सहा. अभियंता सौरभ वर्मा आणि कनिष्ठ अभियंता ओम शिंदे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. वारंवार वीज खंडित का होते? व्यापाऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती करत ग्रामस्थांनी त्यांचावर प्रश्नांचा भडीमार केला आणि रस्त्यावरच ठिय्या धरला. आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी कार्यालयाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र मालवण खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर आणि सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आक्रमक पवित्रा घेत, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आधी समस्या सोडवण्याची जबाबदारी घ्या असे सांगत तीव्र विरोध केला.
वीज बिल माफ करणार असाल तरच बोला : ग्रामस्थ
काही वेळाने प्रभारी चार्ज असलेले देवगडचे उपकार्यकारी अभियंता श्री. लिमकर तिथे पोहोचले. संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत कडक उन्हातच उभे केले. गेल्या वर्षी लेखी हमी देऊनही कारभारात सुधारणा का झाली नाही? लोकांच्या जीवाशी का खेळताय? अशा प्रश्नांनी त्यांना निरुत्तर केले. अखेर श्री. लिमकर यांनी अधीक्षक अभियंता श्री. राख यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. श्री. राख यांनी मी मुंबईला मिटिंगला जात असून लेखी हमी देतो असे सांगितले, पण ग्रामस्थांनी ऐन हंगामात व्यापारी आणि नागरिकांचे झालेले नुकसान भरून द्या आणि वीज बिल माफ करून देणार असाल तरच बोला, असा आक्रमक पवित्रा घेतला.
अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा असा मोर्चा काढला. वीज मंडळाचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, विद्युत मंडळ हाय हाय... अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आचरा तिठा येथील भर चौकात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन सुरू केल्याने कणकवली, मालवण, देवगड आणि आचराबंदर जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या .
दुपारी ऐन उन्हात पर्यटक आणि वाहनचालकांचे हाल होऊ नयेत म्हणून सरपंच जेरॉन फर्नाडिस यांनी आंदोलकांना समजावून तिठ्यावरील आंदोलन मागे घेतले. यानंतर मालवणचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्यासोबत आचरा कार्यालयात बैठक झाली. या चर्चेदरम्यान अधिकारी योग्य उत्तरे देत नसल्याने आणि काहीशी उर्मट भाषा वापरत असल्याने नितीन घाडी, विक्रांत आचरेकर आणि इतर ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले. वाढता उद्रेक पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान झालेल्या गोंधळात आणि धावपळीत कार्यालयातील लाकडी पार्टीशनचे किरकोळ नुकसान झाले.
सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्यासह जि. प. सदस्या वर्षा सांबारी, पं.स. सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, तोंडवळी उपसरपंच हर्षद पाटील, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, मंगेश टेमकर, शाम घाडी ग्रा.पं. सदस्य पंकज आचरेकर, चावल मुजावर, अनुष्का गावकर, किशोरी आचरेकर, श्रुती सावंत, अभय भोसले, गुरु कांबळी, पांडुरंग वायंगणकर, राजन पांगे, चंदू सावंत, जगदीश पांगे, अजित घाडी, उदय घाडी, चंदन पांगे, विजय कदम, विकास कावले, विकास साटम, नारायण कुबल, हर्षद धुरी, शैलेश मुणगेकर, मांगरीष सांबारी, शंकर मिराशी, नितीन घाडी, विक्रांत आचरेकर, सुरेंद्र कुबल, सचिन गुळगुळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.