भरधाव कार गटारात कोसळून चालक ठार; एक जखमी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : भरधाव कार गटारात कोसळून चालक ठार; एक जखमी

आरोंदा-रेडी मार्गावर आदर्शनगर येथे अपघात; मृत व जखमी दोघेही आरोंदा येथील

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः आरोंदा- रेडी मार्गावर आदर्शनगर येथे भरधाव कार अनियंत्रित होऊन गटारात कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. नारायण बाबाजी नाईक (42, रा. आरोंदा आग्राळवाडी) असे मृत चालकाचे नाव असून, कारमधील सोबत असलेला रत्नाकर गंगाराम नाईक (रा.आरोंदा) हा किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण नाईक हे मारुती 800 कार घेऊन आरोंदा ते रेडी जात होते. आरोंदा-आदर्शनगर येथे सरळ रस्त्यावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला गटारात जाऊन जोरात धडकली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले रत्नाकर गंगाराम नाईक हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद आरोंदा -जाधववाडीचे पोलिसपाटील जितेंद्र गंगाराम जाधव यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी मृत चालक नारायण नाईक यांच्यावर अविचाराने व हयगयीने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस व इतरांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. जयेश खंदरकर, आरोंदा दूरक्षेत्राचे ए.एस.आय. महेश आरवारी आणि हवालदार बाळू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आरवारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT