कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर सावडाव तिठा येथे मुंबई-गोवा लेनवर शनिवारी सकाळी 8.45 वा. मॅजिक-सुझुकी कारमध्ये अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघाताची नोंद कणकवली पोलिसात नव्हती.
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी सुझुकी ब्रेझा कार सावडाव तिठा येथील पाणी बॉटल फॅक्टरीजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी पुढे जात असलेल्या टाटा मॅजिक रिक्षाला कारने मागून धडक दिली.धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या बाजूला झाडीझुडपात गेली. अपघातात रिक्षामधील प्रवासी गवस कासिम साठविलेकर (42), मज्जाद अब्दुल रजाक साठविलेकर (30), कासम उस्मान नावळेकर (55) व अहमद युसुफ साठविलेकर (35, सर्व रा. नांदगाव, ता. कणकवली) हे जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . अपघातानंतर पोलिस घटनास्थळी पोचले होते मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कणकवली पोलिस स्थानकात नव्हती.